…तर हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरेल ; संजय राऊत !
बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३
ठाण्यातील मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवर सत्ता व खोक्याची मस्ती आलेल्यांनी बुलडोझर चालवला म्हणून हजारो शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली रस्त्यावर उतरले. आम्ही शनिवारी सायंकाळीच शाखेचा ताबा घेऊ शकलो असतो. आम्ही संयम बाळगला नसता, तर तेथे शिवसैनिकांतच रक्तपात झाला असता व नंतर दंगली घडल्या असत्या. असे घडू नये व दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात राज्यातील वातावरण बिघडू नये, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असे सांगतानाच शिवसेनेच्या शाखेवर अतिक्रमण केल्यास तोडीस तोड उत्तर मिळेल, असा इशारा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी रविवारी दिला.
ठाण्यातील मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली मध्यवर्ती शाखा सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे महापालिकेने पाडल्याचा आरोप झाला. या विरोधात ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक शनिवारी संबंधित या ठिकाणी पोहचले. दुसरीकडे, शिंदे गटाचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरले या वेळी काही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत ठाकरे यांना संबंधित शाखेच्या ठिकाणी येऊ नये व तणाव वाढवू नये, अशी विनंती ठाणे पोलीस आयुक्तांनी केली. मात्र, त्यानंतरही ठाकरे मुंब्य्रात पोहचले. दोन्ही गट आमने-सामने आल्यास काही अनर्थ घडेल म्हणून ठाकरेंना शाखेपासून २०० ते ३०० मीटर अंतरावर रोखले. अखेर ठाकरेंनी परिस्थिती लक्षात घेऊन माघार घेतली. या पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
राऊत म्हणाले, सत्तेत असला तरी आज सांगतो, यापुढे शिवसेनेच्या कोणत्याही शाखेवर अतिक्रमण केले, तर आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ. संबंधित शाखा बाळासाहेबांच्या काळापासून आहे. गेली २५ वर्षे मालमत्ता कर भरल्याची पावती आमच्याकडे आहे, मग ती आता अतिक्रमण कशी झाली. तुमचा बाळासाहेबांशी काहीही संबंध नाही. बेईमान लोकांशी बाळासाहेबांनी कधीही नाते ठेवले नाही. सत्तेत आहे, तोपर्यंत तुम्ही मजा मारा, असा टोलाही राऊतांनी लगावला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम