दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । देशातील सर्वात मोठी घटना उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसाआधी घडली आहे. त्यातील गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची १५ एप्रिल रोजी पोलिसांच्या सुरक्षेत असतानाच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन जणांनी अहमद भावंडांवर गोळीबार करत त्यांना ठार केलं. या तिन्ही जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सन्नी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांना प्रयागराज इथल्या न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आलं. या तिघांच्याही चौकशीसाठी पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने फक्त 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यानंतर आता पोलीस त्यांना काल्विन रुग्णालयाबाहेर घटनेची पुनर्निर्मिती करण्यासाठी घेऊन जाणार आहेत.
अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर गोळ्या झाडणारे हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गुंडाचे चाहते असल्याची माहिती मिळत आहे. गेल्यावर्षी सिद्धु मुसेवाला या गायकाची हत्या केल्यानंतर ते त्याचे चाहते बनले. त्यापूर्वीही ते त्याची मुलाखत पाहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही मारेकऱ्यांचा मुख्य सन्नी सिंह हा होता. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येसाठी तोच उरलेल्या दोघांना तयार करून घेऊन आला होता.
दरम्यान, अतिक अहमदच्या टोळीपैकी एक आणि शूटर असलेल्या असद कालिया याला उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी प्रयागराज इथून अटक केली आहे. कालिया हा अतिक अहमद याच्या जवळचा सदस्य मानला जातो. त्याच्यावर देखील अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यासाठी पोलीस त्याच्या मागावर होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम