बोगदा कोसळला : उत्तरकाशीत कामगार अडकले
बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ब्रह्मखाल – यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ३६ कामगार अडकून पडले. महामार्गावरील सिलक्यारा ते डंडालगाव यादरम्यान रविवारी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून २२० मीटर अंतरावरील भाग कोसळल्याने तेथे काम करणारे कामगार अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ढिगारे हटविण्याचे काम सुरू केले. आत अडकलेल्या मजुरांना श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. त्यांच्यापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्यात येत असून मजुरांना लवकर बाहेर काढण्यात येणार असल्याचा विश्वास उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, अग्निशमन विभाग, आपत्कालीन विभाग तसेच या बोगद्याचे काम करणारी संस्था ‘राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अर्थात ‘एचएचआयडीसीएल’चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला या बोगद्यात ४० मजूर अडकल्याचा दावा करण्यात आला होता. या दुर्घटनेचे वृत्त समजल्यापासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे अधिकाऱ्याच्या संपर्कात आहेत. चारधाम रस्ते प्रकल्पांतर्गत या साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तरकाशीपासून यमुनोत्रीपर्यंतचे अंतर २६ किलोमीटरने कमी होणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम