भिडेंच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांना अश्रू अनावर !
दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ । अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच सोशल मिडीया व माध्यमामध्ये चर्चेत येत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे हे पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत निंदाजनक अशी वक्तव्ये केल्यानंतर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना अश्रू अनावर झाले.
माझ्यासाठी हे वैयक्तिक दु:ख नाही. पण, हा माणूस एवढे निर्लज्जपणे असे भाष्य करतो आणि समोर बसलेली जनता त्यावर हसते. एका महिलेबद्दल जाहीर कार्यक्रमात घृणास्पद वक्तव्ये केली जातात. तरीही महिला याविरोधात आवाज उठवत नाही. पुरोगामी महाराष्ट्र नुसता बसून आहे, हे अधिक चिंताजनक आहे, असे तुषार गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी भिडेंबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. तुषार गांधी म्हणाले, संभाजी भिडेंचे वक्तव्य ही माझ्या वैयक्तिक दु:खाची गोष्ट नाही. आम्ही आमचे दु:ख जिरवू शकतो. पण, त्यांनी महिलांचा घोर अपमान केला आहे. तरीही महिला का गप्प बसून आहेत. पुरोगामी महाराष्ट्र हे का सहन करतोय, याची आम्हाला चिंता आहे. महिलांबद्दल घृणास्पद वक्तव्ये केली जातात आणि समोर बसलेले त्यावर हसतात, यात अधिक घृणास्पद काय आहे? जनतेचे अशा वक्तव्यांवर हसणे हे अधिक घृणास्पद आहे. याचे मला दु:ख आहे. चिंता वाटायला हवी तर याची वाटायला हवी. महाराष्ट्राची जनता हे ऐकून बसून राहिली, गप्प बसून राहिली आणि हसतेय. याची खरी चिंता असायला हवी.
तुषार गांधी म्हणाले, संभाजी भिडेंचे वक्तव्य एकाही महिलेला स्वत:चा अपमान वाटला नाही का? या राज्याच्या मानसिकतेची विकृतता कुठपर्यंत गेली आहे, याचे हे उदाहरण आहे. आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती. पण तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की एका आईचा इतका मोठा अपमान केला जात असताना महाराष्ट्रात एकही महिला याविरोधात आवाज उठवत नाही, एकाही महिलेला स्वत:चा अपमान होतोय असे वाटत नाही. ही चिंतेची गोष्ट आहे. हे एका कुटुंबापुरते मर्यादित नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम