पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक !
दै. बातमीदार । ३० मार्च २०२३ । ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांनी स्विकारल्यापासूनच या-ना त्या कारणानं ट्विटर नेहमीच चर्चेत असतं. तर आपल्या ट्विटरमध्ये अनेक बदल करताना ते दिसून येत आहे. ट्विटरनं आपल्या पॉलिसीमध्ये अनेक फेरबदल केले आहेत. अशातच आता ट्विटरनं मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केलं आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे.
ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीवर ट्विटर हँडल ब्लॉक करावं लागतं. कोणत्याही देशाच्या न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार किंवा योग्य कायदेशीर मागणीनुसार ट्विटर सर्व प्रकारच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यास बांधील आहे. आता पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केलेली कोणतीही पोस्ट भारतात दिसणार नाही. मात्र, आतापर्यंत या कारवाईबाबत भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा पाकिस्तानकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरूनच ट्विटरनं पाकिस्तान सरकारच्या अकाउंटवर कारवाई केली आहे. पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल @GovtofPakistan आहे. आता हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर भारतातील लोक हे ट्विटर हँडल पाहू शकणार नाहीत. पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
इतर देशांमध्ये अकाउंट सुरू राहणार
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलंय की, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलं आहे.”
पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर तिसऱ्यांदा कारवाई
एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचं ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागलं. आता पुन्हा ट्विटरनं भारतात पाकिस्तान सरकारचं
ट्विटर हँडल ब्लॉक केलं आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये ट्विटर इंडियानं भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केली होती. यासोबतच भारतानं भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटवर बंदी घातली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम