राज्यातील या भागात अवकाळी पावसाचा जोर वाढला ; पिकांचे मोठे नुकसान !
दै. बातमीदार । २७ एप्रिल २०२३ । राज्यातील बदलत्या हवामानामुळे काही शहरामध्ये दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. सोबतच वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडतोय. दरम्यान बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमध्ये अवकाळीचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळाला. सोयगाव तालुक्यातील आमखेडा आणि जरंडी परीसरात बुधवारी दुपारी 3 वाजेदरम्यान अर्धा तास झालेल्या वादळी आणि गारपिटीच्या पावसाने केळी, गहू, ज्वारी व मका पिकासह वृक्ष आडवी झाले आहेत. तर आमखेड्यात तीन घरावरील पत्रे उडाल्याने अंदाजे 17 जण जखमी झाले आहेत.
सोयगाव आमखेडा आणि जरंडी परिसरात बुधवारी दुपारी 2.45 ते 3.15 दरम्यान अर्धातास सोसाट्याचा वादळासह गारपिटीसह पाऊस झाला. बोरांच्या आकाराच्या गारा पडल्याने केळी, गहू, ज्वारी आणि मका पिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या छताची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी मोठमोठे झाडं उन्मळून पडले. अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरावरील पत्र उडून गेल्याने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इतर ठिकाणी आसरा घेतला.
आमखेडा येथे बुधावारी वादळी वाऱ्यामुळे अस्वार, गणेश अस्वार व लक्ष्मण अस्वार यांच्या घरावरील पत्रे उडाली आणि त्यावरील दगड अंगावर पडून 17 जण जखमी झाले. लक्ष्मीबाई राजेंद्र जाधव (वय 25 वर्षे), ईश्वर तुकाराम बडक (वय 45 वर्षे), पूजा राजेंद्र जाधव (वय 3 वर्ष), दीदी राजेंद्र जाधव (वय 2 वर्षे) आणि रत्नाबाई संदीप मिसाळ (वय 32 वर्षे) यांचासह इतरांचा जखमीत समावेश आहे. जखमींना गावकऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
सोयगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी झाडं अक्षरशः उन्मळून पडली होती. तर सोयगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील जुने मोठे लिंबाचे झाड दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे विद्युतवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच सोयगाव-बनोटी रस्त्यावर महावितरण उपकेंद्रासमोर वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यावर काही तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पंचायत समितीसमोरही झाड उन्मळून पडले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम