विठूरायाला मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे !
दै. बातमीदार । २९ जून २०२३ । राज्यात आज पंढरपुरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. यावेळी विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा देखील करण्यात आली असून परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.
आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाची महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब व मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली. भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल हे अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडीहून वारीसाठी आले होते. त्यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. हे शेतकरी वारकरी कुटुंब मागील 25 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे.
महाआरतीनंतर पंढरपूर मंदिर समितीने मुख्यमंत्री शिंदे व काळे दाम्पत्याचा विठ्ठल – रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी यंदा ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे,’ असे साकडे विठ्ठलाला घातले. ‘यंदा मला सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. गतवर्षी सरकार स्थापन करून मी विठ्ठलाच्या महापूजेला आलो होतो. विठ्ठलाच्या कृपेने राज्यात सर्वकाही सुरुळीत सुरू असून, सरकार लवकरच आपले 1 वर्ष पूर्ण करणार आहेत,’ असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ‘सर्वजन मला विकास आराखड्याचे काय? असा प्रश्न करतात. याविषयी कुणीही काळजी करू नये. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वांचा विचार घेऊनच या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी वारकऱ्यांना दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा झाल्यानंतर विठूरायाचे मुखदर्शन बंद ठेवण्यात येते. पण यंदा महापूजेचा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच भाविकांना विठूरायाचे मुखदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे हजारो वारकऱ्यांना विठ्ठलाचे महापूजेनंतरचे तेजस्वी रुप पाहता आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम