आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून काय म्हणाले?- मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा
दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२४ । जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत पक्षाविरोधात दंड थोपटले. या आमदारांना विश्वासात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाबरोबर महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच शिंदेंच्या गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचे अधिकृत चिन्हदेखील त्यांनाच मिळाले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एकनाथ शिंदे बंडखोरी करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी ते आणि त्यांच्याबरोबरचे आमदार सुरतमध्ये असताना नेमके काय घडले होते. पडद्यामागे कोणत्या हालचाली केल्या जात होत्या यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केले? नरेंद्र मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी चर्चा केली असता शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता की, शिवसेनेत बंड करून तुम्ही गुजरातमधील सुरत शहरात गेलात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन करून परत बोलावले होते, तुम्ही तिथल्या चहाच्या टपरीवरून त्यांच्याशी बोललात? अशा बातम्या अलिकडे पाहायला मिळाल्या होत्या. त्याबद्दल काय सांगाल, त्यावेळी नेमके काय घडले होते? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मुंबईवरून बोलत आणि जाहीरपणे गेलो. आम्ही काही लपून छपून गेलो नाही. बोलत गेलो… खुलेआम… जाहीरपणे गेलो. राहीला प्रश्न परत बोलावण्याचा तर, एकीकडे आम्हाला परत बोलवायचे आणि दुसऱ्या बाजूला आमचे पुतळे जाळायचे, आमची पक्षातून हकालपट्टी करायची, असा सगळा प्रकार चालू होता. त्याचवेळी भाजपाच्या नेतृत्वाशी फोनवरून चर्चादेखील केली जात होती. ते (उद्धव ठाकरे) भाजपा नेतृत्वाला म्हणाले, तुम्ही यांना (आम्हाला) कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्याबरोबर येतो. परंतु, भाजपा नेतृत्वाने तुम्हाला (ठाकरे गट) त्यांच्याबरोबर घेण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का? आम्ही गेल्यावर तुमच्याकडे काय राहिलंय?, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम