दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । गेल्या काही महिन्यापासून मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळत असतांना पूर्वोत्तर राज्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमने गुरुवारी होणाऱ्या निदर्शनासाठी प्रसिद्ध केला. या व्हिडिओमुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
ITLF चे प्रवक्ते म्हणाले की, कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी महिलांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवले. या व्हिडिओत दिसणारे टोळकी महिलांची छेड काढत आहेत. तर पीडित महिलांना बंधक बनवले आहे. या महिला मदतीची विनवणी करत आहेत. गुन्हेगारांनी हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. या घटनेनं महिलांवर अत्यंत वाईट परिणाम झाला असून सध्या पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी अपहरण, सामुहिक बलात्कार आणि हत्या असा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत संघटनेने निंदा करून केंद्र, राज्य सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून घटनेतील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. कुकी समुदाय गुरुवारी चूरचांदपूरमध्ये विरोधात मोर्चा काढणार आहे त्यात हा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओत २ महिलांना निर्वस्त्र करून खेचून घेऊन जात असल्याचे दिसते. पोलीस तक्रारीत तिसऱ्या महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचाही उल्लेख आहे.
हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो ४ मे रोजीचा आहे. या महिला कुकी समुदायातील आहेत. त्यांच्यासोबत मैतेई समुदायातील लोकांनी छेडछाड करत त्यांची निर्वस्त्र रस्त्यावरून धिंड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. IPC कलमातंर्गत १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४, ३६४, ३२६, ३७६, ३४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तक्रारीत म्हटलंय की, जमावाने १ माणसाला मारून टाकले तर ३ महिलांना निर्वस्त्र केले. त्यातील १९ वर्षीय युवतीसोबत गँगरेप करण्यात आला. जेव्हा त्याचा भाऊ तिला सोडवण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही ठार केले. त्यानंतर ३ महिला अज्ञात व्यक्तींच्या मदतीने तिथून पळाल्या. ४ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास १ हजार लोक एके रायफल्स आणि हत्यारासह फेनोम गावात घुसले. हिंसक जमावाने अनेक संपत्ती लुटली, घरे जाळली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम