माझी औकात काय? मी सेवादार ; मोदी गुजरात निवडणूक प्रचारात !
दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ देशातील गुजरातमध्ये निवडणुकीचे पडघम वाजायची सुरुवात झाली असून याठिकाणी भाजपसह कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने कंबर कसली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले – ‘मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?’ मिस्त्रींनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा केली होती.
पीएम मोदी म्हणाले, ”काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही माझी औकात दाखवा. मी सेवादार आहे. सेवादाराची औकात नसते. तुम्ही मला नीच म्हणा. खालच्या जातीचा म्हणा. माझा मृत्यूचा व्यापारी म्हणून उल्लेख करा. माझी कोणतीच औकात नाही. पण कृपा करा विकासाच्या मुद्यावर बोला. विकसित गुजरात बनवण्यासाठी मैदानात या. औकातीचा खेळ सोडा.”
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या भारत जोडो यात्रेवरही निशाणा साधला. ते म्हणाले – सत्तेतून बेदखल झालेल्या लोकांना यात्रेच्या माध्यमातून पुनरागमन करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावरून राहुलवर निशाणा साधला. काँग्रेस नेते नर्मदा प्रकल्पाला 3 दशकांपर्यंत बंद ठेवणाऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढत आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी मोदींचा घरोघरी व वृद्धांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा नवा अंदाज पहावयास मिळाला. सभा संपल्यानंतर मोदींनी लोकांना घरातील वृद्धांना आपण आठवण काढल्याचे सांगण्याचे आवाहन केले. हे आवाहन त्यांनी रविवारी धोराजीच्या सभेतही केले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र भाईंनी मोडावा अशी इच्छाही व्यक्त केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम