…तर लोकसभा निवडणूक लढविणार ; कालीचरण महाराज
बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३
देशभरातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असतांना आता राज्यात नेहमीच वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आलेले कालीचरण महाराज यांनी देखील लोकसभा निवडणुकीवर मोठे भाष्य केले आहे. ते सोलापूर दौऱ्यावर असताना रविवारी रात्री त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कालीचरण महाराज यांनी सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात रविवारी रात्री मार्गदर्शनपर भाषण केले. भाषणानंतर कालीचरण महाराजांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कालीचरण महाराज म्हणाले, जनतेची इच्छा असेल तर जरूर निवडणूक लढवेन. पण, राजकारणात माझ्यासारखे कडवे लोक चालत नाहीत. मला डिल्पोमसी जमत नाही. मी मला जे खरे वाटते, ते स्पष्टपणे बोलतो. त्यामुळे राजकारणात मी चालेल का? हा प्रश्नच आहे. तसेच, लोकांनी आग्रह धरला तर निवडणुकीला उभे राहणार का? यावर कालीचरण महाराज म्हणाले, मी खूप कडवा आहे, मला तिकीट कोण देणार?
अकोला जिल्ह्यातील कालीचरण महाराज हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुळजापूर लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. याबाबत कालीचरण महाराज यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता जनतेची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवायला तयार असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. मात्र, अशी चर्चा सुरू आहे, हे मला आताच तुमच्याकडून कळत आहे. याबाबत मला काही माहिती नाही, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, कालीचरण महाराज हे कुलस्वामिनी जगदंबा देवीचे कट्टर उपासक आहेत. तुळजापूर हे कुलस्वामिनी जगदंबा देवीचे देवस्थान असलेले लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे कालीचरण महाराज तुळजापूर लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम