‘या’ अभिनेत्याच्या मृत्यूने अवघा महाराष्ट्र हळहळला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ । मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखणे, रुबाबदार नायक अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या एकाकी मृत्यूने अवघा महाराष्ट्र हळहळला असून, सर्वत्र तीव्र शोक व्यक्त होत आहे. आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना चाहत्यांचे डोळे पाणावले.

रवींद्र महाजनी (77) यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी, मुलगा अभिनेता गश्मीर, सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांना शोक अनावर झाला. रवींद्र महाजनी यांचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. रुग्णालयाने त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण यांनी दिली. आंघोळीनंतर कपडे घालताना महाजनी पडले असावेत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज घटनास्थळाच्या पाहणीनंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र महाजनी यांच्यावर आठ वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती ठीक नसल्याने हवापालटासाठी ते गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून तळेगाव-दाभाडेनजीक आंबी येथे एक्झर्बिया सोसायटीतील 311 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये एकटेच भाडय़ाने राहात होते. त्यांचा आजूबाजूच्या लोकांशी फारसा संपर्क नव्हता. मुलगा गश्मीर याच्याशी त्यांचा मोबाईलवर संपर्क होत असे. तीन दिवसांपूर्वीच महाजनी यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम