देशभरात १० वर्षांत २०० कृषी स्टार्टअप
बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३
गेल्या १० वर्षांत कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे १४२ स्टार्टअप उदयाला आले असून, त्यात लवकरच आणखी ६० स्टार्टअपची भर पडणार आहे, अशी माहिती देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप उद्योगाचा हा आलेख भारताच्या शतक महोत्सवी विकासासाठी दिशादर्शक ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी आयोजित कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, केवळ नावीन्यपूर्ण उत्पादन विकासासाठीच नव्हे, तर प्रभावी राष्ट्रीय- जागतिक स्तरावरील ब्रेडिंग आणि विपणनाला अनुकूल ठरेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी संशोधक, संबंधित संस्था आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये व्यापक समन्वय आवश्यक आहे. या प्रक्रियेत सरकारने सुरू केलेला ‘आत्मन’ उपक्रम एक वेगळे व्यासपीठ ठरत आहे. यामध्ये विविध तंत्रज्ञान प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्याबरोबरच संभाव्य कृषी स्टार्टअपना संकल्पना, प्रोटोटाइपविकास, उत्पादन चाचणीसाठी सहाय्य करण्यात येत आहे.
या धर्तीवर देशातील रोपर, मुंबई, इंदूर आणि खरगपूर या चार आयआयटी संस्थांनी परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आहे. या चार आयआयटीतील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांच्या पुढाकाराने ६० स्टार्टअपना एकूण २० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे, याकडेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले. या स्टार्टअपमार्फत कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, शेतमालाची नासाडी कमी करण्यासाठी आणि शेतजमिनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचे विविध पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम