मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर ठाकरेंच्या शाखेवर फिरविला बुलडोझर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जून २०२३ ।   राज्यातील ठाकरे व शिंदे गटातील वाद मोठा होत असल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. नुकतेच मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. तब्बल 40 वर्षांपासून ही शाखा तेथे अस्तित्वात होती. त्यामुळे या कारवाईवरून राजकारण तापले आहे.

मुंबई महापालिकेच्या या कारवाईमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार शाखेतील उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे प्रथम फोटो हटवले. त्यानंतर बुलडोझरने पाडकाम करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कारवाईवरून माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. हाजी हलीम खान यांनी म्हटले आहे की, शिंदे गटात येण्यासाठी मला 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर नाकारल्यामुळेच माझे कार्यालय असलेल्या या शाखेवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईवरुन शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. खासदार अरविंद सावंत म्हणाले, ज्या शाखेवर महापालिका कारवाई करत आहे, ती शाखा 40 वर्षे जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील पालिका प्रशासनाने अधिकृत केल्या आहेत. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असे महापालिका कसे म्हणू शकते?. गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेने ठाकरे गटाविरोधात कारवाई करत आहेत. हे योग्य नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम