सहकार विद्या मंदीराच्या ऐतेहासिक इफ्तार पार्टीत घडले हिंदु-मुस्लिम ऐक्याचे विराट दर्शन

पवित्र रमजान महिन्यात अल्लाह करतो कृपेच्या खजिन्याची सगळी कवाडे खुली

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | रमजान महिना पवित्र आहे, या महिन्याचा महिमा अगाध आहे, या महिन्यात अल्लाह आपल्या कृपेच्या खजिन्यांची सगळी कवाडे उघडी करतो, रखरखत्या उन्हात कडकडीत उपवास धरणाऱ्यांवर कृपेचा अमोघ वर्षाव करतो, रमजान महिन्याला पावित्र्याचे अनेक पदर आहेत, याच महिन्यात पैगंबरे आखिरुञ्जमा हुजूर पुरनूर हजरत मोहम्मद सललल्लाहो अलैह वसल्लम यांच्यावर पवित्र कुरआने करीम, फुर्काने हमीद अवतरले ज्या कुरआने करीमने मानवाला सत्याचा आणि मुक्तीचा रस्ता दाखवला प्रेम, करुणा आणि त्यागाचा मंत्र दिला, सुरये फातिहामध्ये अल्लाह रब्बुल इज्जतचा उल्लेख रब्बुल आलमीन असा आहे.

 

रब्बुल आलमीन याचा अर्थ संपुर्ण सृष्टीचा, सुपर्ण जगाचा स्वामी, अल्लाहचं अस्तित्व फक्त मुस्लिमांपर्यंत मर्यादीत असतं तर सुरये फातिहामध्ये रब्बुल आलमीन ऐवजी रब्बुल मुस्लिमीन या शब्दाचा वापर अल्लाहतआलाने केला असता, अल्लाह त आलाला सकल मानवजातीचे, समष्टीचे कल्याण हवे आहे, प्रत्येक जीव एकच ईश्वराची घडण आहे तद्ववत पसायदान म्हणजे विश्वकल्याणाची प्रार्थना, हिंदुच्या देवा, मुस्लिीमांच्या देवा, ख्रिश्चनांच्या देवा अशी हाक ज्ञानोबा माऊलीने दिली नाही, ज्ञानोबा म्हणाले आता विश्वात्मके देवे अर्थात संपुर्ण सृष्टीचा स्वामी प्रत्येक धर्माला मानव कल्याण अभिप्रेत आहे, माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयतेच्या उतरंडी रचल्या, माणसामाणसात अंतराची बीजे रुजवली असे चिंतनीय प्रतिपादन बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी केले.

 

बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटी आणि सहकार विद्यामंदिर बुलडाणाचे संयुक्त विद्यमाने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या २८ व्या रोज्याच्या पावन दिवशी ८ एप्रिल २०२४ रोजी भव्यदिव्य तकरीबे इफ्तार अर्थात इफ्तार पार्टीचे आयोजन ऑडीटोरीअम हॉलमध्ये करण्यात आले होते. इफ्तार पार्टी निमित्त सद्भावना समारंभाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी होते. प्रमुख अतिथी म्हणुन बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर (चांडक), एल. सी. बी. चे ठाणेदार अशोकराव लांडे, बुलडाणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे, सेवानिवृत्त ठाणेदार सत्तार चाँद शेख उर्फ नब्बु साहेब मंचावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित अतिथींचा सत्कार बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी केला.

प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या बहारदार आणि श्रवणीय सुत्रसंचालन समारंभाचा आरंभ झाला, अजीम नवाज राही यांनी आपल्या रसाळ वाणीतुन राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या आजतागायतच्या सर्वसमावेशक कामगिरीचा ताळेबंद ओघवत्या शैलीत मांडला, भाईजीसारखी माणसे समाजात सकारात्मक बीजे रुजवण्याचं काम करत असतात, बुलडाणा अर्बनच्या माध्यमातुन भाईजींच्या कर्तुत्वाचा पर्यायाने बुलडाणा जिल्हयाच्या कर्तबगार मातीचा सुगंध संपुर्ण आशिया खंडात दरवळत आहे.

 

प्रास्तविकपर मनोगतामध्ये डॉ. सुकेश झंवर म्हणाले की, रमजान रोजा म्हणजे माणसाने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणे, शारीरीक आणि मानसिक धैर्याचे कृतीशील अनुसरन म्हणजे रोजा, गोरगरीबांची भुकेने होणारी हीनदीन अवस्था उमजून घेणे म्हणजे रोजा, तहानेच्या व्याकुळतेच्या परमोच्च बिंदु गाठणे म्हणजे रोजा, साठवणुकीला फाटा देत वंचिताच्या मदतीस्तव धावून येणे म्हणजे जकात, कलमा, नमाज, रोजा, जकात, हज इस्लाम धर्माच्या पाच महत्वपुर्ण बाबींवर आपल्या प्रस्ताविकातुन डॉ. सुकेशजी झंवर यांनी अभ्यासप्रचुर प्रकाशझोत टाकला. शहरातील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणुन मोहम्मद हारुन सर यांनी अस्खलीत उर्दूत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

मौलाना शहेजाद यांनी रोजा इफ्तारीच्या नियतचे लयदर पठण केल्यावर व सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात मुस्लिम बांधवांनी राजा सोडला, सहकार विद्या मंदिरात अजानचे पवित्र स्वर घुमले, अजाननंतर लगतच्या मंडपात नमाजे मगरीब अदा करण्यात आली, विशेष म्हणजे मुस्लिम महिलांसाठी इफ्तार आणि नमाजची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीसाठी जवळपास १५० मुस्लिम भगीनी व २५० च्यावर मुस्लिम बांधव उपस्थित होते ही लक्षणीय उपस्थिती या इफ्तार पार्टीचे वैशिष्टय ठरले.

एकंदरीत अजीम नवाज राही यांच्या मराठी आणि उर्दू भाषेतल्या रसाळ सुत्रसंचालनाखाली बुलडाणा अर्बन आणि सहकार विद्या मंदिराने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत हिंदु-मुस्लिम ऐक्याचे विराट दर्शन घडले.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम