अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील काही नामवंत कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. गुरुवारी मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. तर 11 जुलै रोजी अभिनेते रवींद्र महाजनी हे तळेगाव इथल्या एका सदनिकेत मृतावस्थेत आढळले होते.

गुरुवारी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरत असतानाच आज (शुक्रवार) मराठी कलाविश्वातील आणखी एक तारा हरपला. ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं. सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे.
मिलिंद सफई यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. प्रेमाची गोष्ट, थँक्यू विठ्ठला, पोस्टर बॉईज, लकडाऊन बी पॉझिटिव्ह यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तर आई कुठे काय करते या मालिकेशिवाय त्यांनी ‘सांग तू आहेस का’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘100 डेज’ यांमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित मिलिंद यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अभिनेते मिलिंद सफई यांचं कॅन्सरने निधन, भावपूर्ण श्रद्धांजली’, असं लिहित त्यांनी त्यांचा फोटो पोस्ट केला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम