अजित पवारांच्या आईची इच्छा : दादाने माझ्या डोळ्यासमोर मुख्यमंत्री व्हावे !
बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३
राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठी फुट पडून भाजप व शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी समाधान मानावे लागले आहे. तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अनेकदा त्यांच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग बाजी देखील केली होती पण आता त्यांच्या आईने देखील मुख्यमंत्री आपल्या मुलाने माझ्या डोळ्यासमोर व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याने आता राज्याच्या राजकारणात भविष्यात काय घडणार या कडे लक्ष लागून आहे.
राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. तर बारामती येथे मतदान केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार म्हणाल्या कि, मी आता 86 वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीतही आज मतदान होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले असले तरी काटेवाडीत मात्र अजित पवार गटासमोर भाजप उभा ठाकला आहे. याठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशा पवार यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
मतदान करुन आशा पवार केंद्राबाहेर येताच त्यांना पत्रकारांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर आशा पवार यांनीही मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केली. आशा पवार म्हणाल्या, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. दादावर लोकांचे प्रेम आहे, पण पुढचे काय सांगता येते? सर्वांना वाटते की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. आता मी ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोकांचं काय सांगता येतं?, अशी एक शंकाही आशा पवार यांनी व्यक्त केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम