अजित पवारांची चौफेर टीका ; बेडकाला वाटतं मी फुगलो आहे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ फेब्रुवारी २०२३ । सध्या राज्याचे राजकारण पुण्याच्या पोटनिवडणुकीत जोरदार सुरु आहे. अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावत टीका टिपणी केली जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक होत असून याची चर्चा सगळीकडे आहे. या निवडणूकीत भाजप -शिंदे गट , महाविकास आघाडीने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी सभा, बैठका आणि भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.
सोमवारी चिंचवड येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी आपल्याला चिंचवड, कसबा पेठ ही निवडणूक जिंकायची आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्ययाचा आहे, अशी भावनिक साद अजित पवार यांनी मतदरांना घातली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा आपल्या विचारांच्या निवडून आल्या आहेत. म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाला त्यांना त्यांची जागा समजलेली आहे. मात्र, आपल्यासाठी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत घेयचा आहे, असे अजित पवार म्हणाले.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा एकही आमदार, खासदार निवडून येणार नाही, असा दावा त्यांनी केला. शिवसेना कोणी काढली हे सर्वांनाच माहिती आहे. जे गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्ही ते पाहिले आहे. पानटपरीवाले, वाहन चालवणारी साधी साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सर्व बाळासाहेबांमुळे झाले, असे अजित पवार म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागुद्या, त्यांची काय अवस्था होते ते समजेल, असा टोला देखील अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले, बेडकाला वाटतं मी फुगलो आहे. मात्र, ते फुगलेपण काही खरं नसते, यात बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे. कोणतरी सांगितलं, अर्ज काढू नको. विरोधकांना वाटलं असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर आपणांस निवडणूक सोप्पी जाईल. परंतु, कृपा करुन कोणी रूसू आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणायची आहे, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम