
एका क्लिकमुळे वृद्धेला बसला लाखोंचा फटका
दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ । तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे जशा ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहे, तशाच ऑनलाइन गुन्ह्यांची संख्या व तिची पाळेमुळेही वाढतच चालली जात आहे. अशाच एका घटनेत एका ६३ वर्षीय महिलेने तिचे लाखो रुपये गमावले आहेत. निस असे या महिलेचे नाव असून, ती थायलंड येथील ट्रांग प्रांतात राहते.
मिळालेल्या माहितीनुसार, निस यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण थायलंडच्या महसूल विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगत निस यांच्या फोनवर एक लिंक सेंड केली व सदर लिंक महसूल विभागाची असून या लिंकच्या मदतीने आपण टॅक्स चेक करू शकता, असेही सांगितले.
यानंतर निस यांनी जेव्हा त्या लिंकवर क्लिक केले तेव्हा होत्याचे नव्हते झाले. लिंकवर क्लिक केल्यामुळे त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होऊन केवळ ३ हजार रुपयेच शिल्लक राहिले.
लिंकवर क्लिक करताच फोनची स्क्रिन निळ्या रंगाची झाली. यानंतर महसूल विभागाच्या लोगोसह एक पॉप अप मेसेज आला, ज्यात काही इंस्ट्रक्शन्स देण्यात आले. ते फॉलो केल्यानंतर बँक अकाऊंट रिते झाले व फोन आपोआप लॉक झाला, तेव्हा मोबाईलवर आलेल्या बँकेच्या मेसेजमध्ये खात्यातून ३२ लाख काढल्याचे लिहिलेले दिसले.
याबाबत निस यांनी आपली मुलगी निदा आणि सून सिरिवान याच्या माध्यमातून बँकेशी संपर्क केला आणि त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तरी या घटनेमुळे निस यांना धक्का बसला असून, त्यांनी हे पैसे औषधोपचारासाठी ठेवले होते, असे वृत्त आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम