अज्ञात शक्तीने शिवसेनेसह राष्ट्रवादी फोडली ; सुप्रिया सुळे !

बातमी शेअर करा...

बातमीदार| ६ ऑक्टोबर २०२३

एक अज्ञात शक्ती महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. या शक्तीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अन्याय सुरू केला आहे. त्यांची मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री व आता काही जणांचे पालकमंत्री पद काढून पदावनती केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी येथे केली.

खा. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दुपारी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. तेथील अधिष्ठाता तसेच अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गुरुवारी यारग्णालयात उपचार चालू असताना एक लहान बालक दगावले. त्याच्या आईने खा. सुळे यांना भेटून हंबरडा फोडला आणि येथील भोंगळ कारभार कथन केला, असे त्यांनी सांगितले. हे सरकार असंवेदनशील आहे. अकार्यक्षम आहे. यापूर्वीही रेल्वे अपघात, तसेच पनवेल येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनेक जण मरण पावले. त्याप्रकरणी चौकशी झाली. परंतु त्या चौकशीचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला. नांदेडच्या दुर्घटनेनंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत नांदेडच्या रुग्णालयाविषयी काहीही निर्णय झाला नाही. या रुग्णालयाचे महावितरणचे बिल थकित आहे. औषधी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे बिल थकले आहे. नोकर भरती झाली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्याला जबाबदार असलेल्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने खा. शरद पवार यांच्याविरुद्ध टीका करतात. त्यांच्या विरुद्ध टीका केल्याने त्यांना प्रसिद्धी मिळते. ती मिळवण्यास आमची हरकत नाही, परंतु टीका करून वेळ मिळाल्यास त्यांनी नांदेड, संभाजीनगर, ठाणे, नागपूर आदी रुग्णालयांत हलगर्जीपणामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडेही बघावे. शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम