आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अटक करा ; कोकाटे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ । राज्यात यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सोहळा खारघर येथे झाला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी सत्ताधाऱ्यांसह आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या घटनेला जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी खारघरमधील दुर्देवी घटनेतील श्रीसेवकांच्या मृत्युस आप्पासाहेब धर्माधिकारी हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय या कार्यक्रमात निष्पाप लोकांचा बळी गेल्याने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणीही कोकाटे यांनी केली आहे. भर दुपारी 43 अंश सेल्सिअस तापमानात हा कार्यक्रम घेतला. यावेळी श्री सेवकांना 7 तास पाणी देखील दिले गेले नाही. मात्र पुरस्कार वितरण करणारे राज्यकर्ते एकाच मंचावर एसीमध्ये उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात झालेले मृत्यू हे नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाल्या आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम हा धर्माधिकारी यांच्या अट्टाहासामुळे कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. त्यांच्या या हट्टाहासामुळेच साधकांच्या हत्या झाल्याचा गंभीर आरोप कोकाटे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारला मृत्यू झालेल्या श्रीसेवकांविषयी आपुलकी असेल तर पोलीस खात्याने धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली.

याप्रकरणी कोकाटे यांनी राज्य सरकारला देखील जबाबदार धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना या पक्षांनी रामदासी संप्रदायाचे विचार लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन शिवसेना भाजप सरकारने महाराष्ट्राचा व थोर महापुरुषांचा अपमान केल्याचे कोकाटे म्हणाले.

मृत झालेल्या 14 पैकी 12 सदस्यांनी सात तास काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपाशी पोटी ते रणरणत्या उन्हात बसून होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम