बोगद्यात ऑगर मशीनमध्ये बिघाड : बचावकार्य ठप्प !
बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३
गेल्या काही दिवसापासून उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी ऑगर मशीनने ड्रिलिंग केले जाणार नाही. कामगारांपासून अवघ्या 10 मीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारपासून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. आता प्लाझ्मा कटरने ऑगर मशीनचे शाफ्ट आणि ब्लेड कापून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
यंत्राचे तुकडे काळजीपूर्वक काढले नाहीत तर बोगद्यात टाकलेली पाइपलाइन फुटू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणून, ऑगर मशीनचा तुटलेला भाग काढून टाकल्यानंतर, मॅन्युअल ड्रिलिंग सुरू होईल. मात्र, त्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
दरम्यान, आजपासून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत यावर काम सुरू होऊ शकते. याशिवाय बोगद्यात फोन लँडलाइनही टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता येणार आहे. वास्तविक 21 नोव्हेंबरपासून सिल्कियारा बाजूकडून बोगद्यात आडवे खोदण्याचे काम सुरू होते. ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. 60 मीटर भागापैकी 47 मीटर पाईप ड्रिलिंगद्वारे टाकण्यात आले आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 10-12 मीटर अंतर बाकी होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंग मशिनसमोरील रॉड आल्याने ड्रिलिंग मशीनचा शाफ्ट अडकला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम