पुण्यात अद्याप बाप्पांच्या मिरवणुका सुरूच !
बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३
राज्यात गुरुवारी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली असून पुण्यात अद्याप मिरवणुका सुरूच आहेच. मानाच्या गणपतींचे काल उशिरा विसर्जन पार पडले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
काल साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले. त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीनंतर या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरु झाली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. तर पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला संपायला अजून ३ ते ४ तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून २०० मंडळांचे गणेश विसर्जन बाकी आहे.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या मंडळांचा हा आकडा आहे. पुण्यातील गणेश मिरवणूक रेंगाळला जाण्याची शक्यता आहे. तर पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले त्यामुळे आता फक्त पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम