भिडे आज वाशीममध्ये ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त !
बातमीदार | ३० जुलै २०२३ | राज्यात आपल्या विधानाने गेल्या दोन दिवसापासून चांगलेच चर्चेत आलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांचे वाशिम शहरात व्याख्यान होत आहे. संभाजी भिडे यांना वाशिम जिल्ह्यात प्रवेशास परवानगी देऊ नये, यासाठी आज सकाळीच वंचित बहूजन आघाडीसह आंबेडकरवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेसनेही भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांना इतर मार्गाने कार्यक्रम स्थळी नेल्याची माहिती आहे.
संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधींबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर काल यवतमाळमध्येही पंडित नेहरूंविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह, आंबेडकरी संघटना आणि काही सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे वाशिममधील कार्यक्रमाला विरोध होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी कार्यक्रम स्थळी बंदोबस्त वाढवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम