मोठी बातमी : अखेर ‘त्या’ निवडणुकीतून भाजपने घेतली माघार
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होत. त्याच विषयाला जोड म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, अनेक राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे. बावनकुळे नागपूरमध्ये बोलत होते. आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा,’ अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम