दै. बातमीदार । २० जून २०२३ । देशातील काही राज्यात मोठ्या प्रमाणात बिपरजॉय वादळाचा संकट कायम आहे. यामुळे राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने बरंच नुकसान केलं. मात्र, आता याच पावसामुळे अनेकांना साप चावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
पश्चिम राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात सर्पदंशाची एक मोठी घटना समोर आली आहे. येथील चौहटन भागात एकाच रात्रीत 19 जणांना साप चावला. त्यामुळे इथल्या उपजिल्हा रुग्णालयात एकामागून एक रुग्ण पोहोचू लागले. सापाच्या चाव्यानंतर लोक एकत्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्व जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने त्यांच्या बिळातून साप बाहेर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चौहटन परिसरात सर्पदंशाची ही घटना समोर आली.
अचानक सर्पदंशाच्या 19 घटना घडल्याने वैद्यकीय विभागही अलर्ट मोडवर आला. रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान चौहटन उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशाचे 19 रुग्ण दाखल झाले. चौहटन परिसरातील चाडार, धारासर, नवातला जेटमाल, खारिया राठोडन, गंगाला, उपर्ला, सनाऊ, कापराऊ या गावांतून ही सर्पदंशाची प्रकरणे समोर आली आहेत.रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एकाही रुग्णामध्ये सापाच्या विषाचा अधिक आणि घातक परिणाम आढळून आला नाही ही चांगली बाब आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चौहटन भागात बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला.
तज्ज्ञांच्या मते, त्यानंतर आर्द्रता वाढल्याने साप आणि इतर विषारी जीव बिळातून बाहेर येऊ लागले. ही काही नवीन गोष्ट नाही. पावसामुळे साप बिळातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. सर्व 19 रुग्णांची तातडीने तपासणी करून उपचार सुरू करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांना आराम मिळाला. सर्व प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये सामान्य विषबाधा आढळून आली. त्यामुळे त्यांच्या उपचारात कोणतीही अडचण आली नाही. चौहटन येथे एकाच रात्रीत सर्पदंशाच्या इतक्याच घटना समोर आल्याने हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णांसोबत आलेल्या कुटुंबीयांनी वेगवेगळी माहिती देताना सांगितलं की, शेतात काम करून परत येताना, शेतात काम करताना, नांगरणी करताना, घरात इकडे-तिकडे काम करताना, पशुधनाची काळजी घेताना, आदी कामे करताना साप चावला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम