भाजपच्या खासदाराने शिंदे सरकारमधील मंत्र्यांची घोटाळ्याची कागदपत्रे पुरवली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  राज्यातील शिंदे सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्यांची कागदपत्रे 15 दिवसांपूर्वीच भाजपच्या एका खासदाराने माझ्याकडे दिली होती, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक मंत्री टार्गेटवर असून भाजपचा बडा नेताच या घोटाळ्यांची कागदपत्रे पुरवत आहे, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.

दि. 18 रोजी ठाकरे गटाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात सुषमा अंधारेंनी हा गौप्यस्फोट केला. आपल्या जाहीर भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्यांची जंत्रीभाजपच्या एका खासदारानेच माझ्याकडे दिली होती. मात्र आम्ही दुसऱ्याने दाखवलेल्या शिकारीवर झडप घालणारे नाहीत, आम्ही स्वतः शिकार करतो. त्यामुळे मी त्यावर आवाज उठवला नाही, पण घोटाळ्याचे ते बिंग अवघ्या 15 दिवसांतच फुटले. 15 दिवसांतच त्यावर वृत्तपत्रात बातम्या आल्या.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती सुरू आहे. मराठवाड्यातील शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्याला टार्गेट केले जाणार आहे. या मंत्र्याच्या घोटाळ्याची सर्व माहिती भाजपचा बडा खासदार पुरवत आहे. येत्या 7-8 दिवसांत या मंत्र्याच्या घोटाळ्याच्या बातम्या तुम्हा सर्वांसमोर येतील. सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत. सध्या शिंदे-फडणवीस यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याचे दिसत असले तरी त्यांचा घटस्फोट निश्चित आहे. ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुनही सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर सडकून टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, एका महिलेवर छुप्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. पाठीमागून वार करणारे हे लांडगे असतात. शिंदे गटात वाघ नाही तर लांडगे आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम