विरोधकांच्या नावाने भाजपला बसणार धक्का !
दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ । भाजपला हरविण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये सोमवार आणि मंगळवार दोन दिवशीय बैठक पार पडली. या बैठकीत लोकशाही आणि देश वाचविण्यावर चर्चा झाल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यावरही चर्चा झाली. पंतप्रधान पदाचा उमेदवार हा निवडणुकानंतर ठरवण्यावरही एकमत झाले. दरम्यान, या सगळ्यांमध्ये भाजपला मोठा धक्का बसवणारी बाब म्हणजे या विरोधी आघाडीने निवडलेले नाव I-N-D-I-A..
विरोधी पक्षांनी त्यांच्या नव्या युतीचे नाव ‘इंडिया’ (भारत) असे ठेवले आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. पूर्ण नाव असेल – इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स. बैठकीत सहभागी असलेल्या विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. या सगळ्यांमधला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, विरोधकांनी आपल्या युतीचं नाव भारत असं का ठरवलं आहे? यामागे विरोधकांचे राजकारण काय?
“INDIA” I – Indian N – National D – Democratic I – Inclusive A – Alliance.’ (भारतीय – राष्ट्रीय – लोकशाही – समावेशक – आघाडी)
विरोधकांचं राजकारण पाहिलं तर असे दिसून येते की, अनेकदा भाजपकडून विरोधी पक्षांच्या नावांचे वेगवेगळे अर्थ काढून खिल्ली उडवली जायची. मात्र आता विरोधी आघाडीने मोठी खेळी खेळली असून भाजपला आता यापुढे इंडिया नाव उच्चारून त्यावर टीका करता येणार नाही. ही विरोधी आघाडीसाठी मोठी जमेची बाजू आहे. भाजप स्वतःला राष्ट्रवादी पक्ष म्हणवतो. अशा परिस्थितीत भाजपच्या बाजूने भारताच्या नावाचा कोणताही चुकीचा अर्थ काढला गेला तर त्याचा चुकीचा संदेशही जनतेत जाईल. त्यामुळे विरोधी पक्षांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. दुसरे महत्वाचे कारण पाहिले तर राजकारणात सर्वात मोठं नाव म्हणजे इंडिया हेच आहे. इंडिया हे नाव सर्वांच्या आपुलकीचे आहे. आय लव्ह माय इंडिया असे प्रत्येकाच्या तोंडून आपण ऐकतो. त्यामुळे विरोधी आघाडीच्या या नावाचा थेट परिणाम होणार आहे. एकंदरीत इंडिया या नावामुळे विरोधी आघाडीला खुप मोठा फायदा होणार आहे. विरोधी आघाडीने इंडिया नाव निवडल्याने भाजपला मोठा धक्का बसला असण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम