कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाहीच !
बातमीदार | ८ नोव्हेबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा तीव्र झाला आहे तर दुसरीअडे गेल्या काही दिवसांपासून कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता या चर्चेला मंदिर समितीने पूर्णविराम दिला आहे. मराठा समाजाचा रोष पाहून मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या यासंबंधीच्या भावना शासनाला कळवण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर दिली.
सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. पंढरपुरातही हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज सध्या आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही मंत्री, आमदार, खासदार यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. यंदा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा. मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम