आमदारांना गाजर का ? शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी ?
दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस होवूनही अजूनही मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना – दीड महिन्याने झाला. आता पुढचा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, शिंदे गटातल्या नाराज आमदारांना नवं गाजर दाखवण्यात येणार असल्याची माहिती हाती येत आहे.
शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. अजूनतरी मंत्रिमंडळ विस्ताराचा जवळचा मुहुर्त दिसत नाही. त्याऐवजी अशा नाराज आमदारांकडे विविध महामंडळांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. जबाबदारीही द्यायची आणि नाराजीही दूर करायची असा दुहेरी नेम शिंदे – फडणवीस या माध्यमातून साधणार असल्याची चर्चा आहे. राज्यातल्या विविध महामंडळांची अध्यक्षपदे असंही रिक्त आहे. कोरोनामुळे महाविकास आघाडी सरकारने या नियुक्त्यांबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे आता शिंदे – फडणवीस सरकार या रिक्त अध्यक्षपदी नाराज आमदारांना बसवणार आणि त्यांची नाराजी दूर करणार, असं नियोजन करत असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातले मंत्री उदय सामंत यांनीही असेच संकेत दिले होते. महामंडळ नियुक्त्यांवरुन लवकरच निर्णय घेतला जाईल, असं विधान त्यांनी केलं होतं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम