चांद्रयान-३ चा पहिला संदेश : भारत, आम्ही लक्ष्य गाठले !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३| १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांना घेऊन उड्डाण केलेले चांद्रयान-३ अलगदपणे चंद्रावर उतरताच देशवासीयांची छाती अभिमानाने फुगली आहे. २३ ऑगस्ट, सायंकाळी ६ वाजून २ मिनिटे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर चांद्रयानाने स्पर्श करताच ही तारीख, वेळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. चांद्रयान-३ ने पहिला संदेश पाठवला- भारत, आम्ही लक्ष्य गाठले आहे अन् तुम्हीही. या यशासोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. लँडरशी संपर्क स्थापित झाला आहे. तो सिग्नलही पाठतोय. आम्हाला खूप आनंद झालाय. जे यश चार वर्षांपूर्वी मिळावयास हवे होते ते आज मिळाले. मोहिमेला माफक पैशांत पूर्ण करण्यासाठी आम्ही पृथ्वी आणि चंद्र दोघांच्याही गुरुत्वाकर्षणाचा वापर केला. चंद्रावर पाय ठेवण्यापूर्वी चांद्रयान-३ ने ४० दिवसांत पृथ्वीच्या २१ आणि चंद्राच्या १२० प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या. चांद्रयानाने चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख अंतराचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ५५ लाख किलोमीटर अंतर कापले. आता आम्ही विक्रम लँडरची तपासणी करणार आहोत.

रोव्हर बाहेर आले आहे. विद्यमान परिस्थिती पाहता काही तास ते एक दिवसही लागू शकतो. यानंतर लँडर आणि रोव्हर दोन्हींवर उपकरणांव्दारे परीक्षण सुरु होईल. आगामी १४ दिवस अत्यंत रोमहर्षक आणि उत्साहपूर्ण असतील. रोव्हर चंद्रावर चालेल त्यावेळी विविध प्रयोगांच्या माध्यमातून जगाला नव्या विज्ञानाचा परिचय होईल. अाजच्या यशामागे निवृत्त वरिष्ठांचेही योगदान आहे. चंद्रावर आज आपण ज्या ठिकाणी पोहोचलो त्यावर सातत्याने निगराणी करणे आमच्या आवाक्याबाहेर होते. त्यासाठी युरोपियन अंतराळ संस्था अाणि अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ ने साहाय्य केले आहे.

डोळ्यांसमोर इतिहास घडताना पाहिल्यावर जीवन धन्य होते. विकसित भारताच्या शंखनादाचा, नव्या भारताचा जयघोष करण्याचा, अडचणींचा महासागर पार करून विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला आहे. मी त्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो, ज्यांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने भारत दक्षिण ध्रुवावर पोहोचला, जिथे जगातील कोणताही देश पोहोचू शकला नाही. आजपासून चंद्राशी संबंधित समज, कथा आणि म्हणीही बदलतील. भारतात पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतात. एके काळी चंदामामा दूरचे, असे म्हटले जात होते. आता तो दिवसही येईल, जेव्हा मुले म्हणतील- चंदामामा फक्त एका टूरचे… ‘स्काय इज द नॉट लिमिट’ असे भारत पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम