धमक्यांना भिक घालत नाही ; मंत्री छगन भुजबळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करीत असतांना यांच्यावर बोलतांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी त्यांच्यावर टीका केली होती.

ब्राह्मण समाजात शिवाजी व संभाजी नावे ठेवत नाहीत, असे विधान छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांवर भाष्य करताना केले होते. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विस्वजीत देशपांडे यांनी या प्रकरणी भुजबळांच्या कानशिलात मारणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, संभाजी भिडे मुळात मनोहर कुलकर्णी आहेत हे खरे आहे की नाही ते अगोदर सांगा. ते वाटेल ते बडबड करतात. ते मनोहर कुलकर्णी असतील, तर ते संभाजी नाव घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याविषयी गलिच्छ विधाने का करतात? त्यांनी खास ही शिवीगाळ करण्यासाठी संभाजी नाव घेतले आहे का? त्यांचे खरे नाव काय? सहसा अशी नावे या समाजात नसतात. माझे केवळ एवढेच म्हणणे होते. छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, सरस्वतीच्या बाबतीत मी म्हणालो होतो की, आमचे हे देव आहे. शाळेत, शिक्षणात यांचे कर्तृत्व आपण पुढे आणले पाहिजे. घरात कुणी कुणाचाही पूजा करा. माझी काही हरकत नाही. पण माझे मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.

या प्रकरणी अधिक बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले काम करत होते. त्यावेळी ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी त्यांना मदत केली. तेव्हा कर्मठ ब्राह्मण्यवादाची परिस्थिती का होती? एवढेच मी सांगत होतो. शाळा, कॉलेजच्या मुलांसमोर बोलणे स्वाभाविक आहे. त्यात कुणाला राग येण्याचे कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. व्हॉट्सअपवरून मला धमक्यांचे मेसेज येत आहेत. हे लोक मी ब्राह्मण आहे म्हणतात आणि अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात. अशा लोकांना ब्राह्मण कोण म्हणणार? घाणेरड्या शिव्या देणाऱ्यांना आम्ही ब्राह्मण म्हणायंच? मला शिवीगाळ करणाऱ्यांविषयी बोलतोय मी. मी चुकलो असेन, तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी. तसेच इतर कुणी चुकत असेल, कायदा हातात घेत असेल, तर त्यांच्याविरुद्धही पोलिसांनी कारवाई करावी, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम