सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; भावाने घेतला भावाचा जीव

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या खुनाच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना यात आणखी एका घटनेची भर पडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. मोरीत लघुशंका करण्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे घडली असून, सत्यवान महाजन (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे.

या घटनेचा उलगडा तालुक्यातील भातखंडेजवळच्या गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने झाला. तपासाअंती या इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, सत्यवान महाजन हे नाव समोर आले.

याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला व मयत सत्यवानचा मोठा भाऊ भगवान यानेच हा खून केला असल्याचे निदर्शनास आले. भगवान महाजन याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पोलिसांना घटनाक्रम सांगितला.

या घटनाक्रमानुसार, भगवान महाजन (वय ६२) आणि सत्यवान महाजन (वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) गावातील रहिवासी आहेत. एकाच घरात राहत असूनसुद्धा बऱ्याचदा दोघांत वाद होत होते. दि. १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून झालेल्या वादात संतापलेल्या भगवानने सत्यवान यांच्या डोक्यात मुसळी मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला व रात्री उशिरा पोत्यातून मृतदेह नेऊन गिरणा नदीपात्रात फेकून दिला.

लहान भावाचा मृतदेह गिरणा नदीपात्रात आढळल्याचे कळताच भगवान घरातून पसार झाला. त्याने एका व्यक्तीला या घटनेची संपूर्ण माहिती दिली. व्यक्तीने भगवानला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. परंतु त्याने तेथून पोबारा केला.

शेवटी उत्राण पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल बस स्थानकावरून भगवान महाजन याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम