शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाईल दुकानातील लाखोंचा ऐवज लंपास
दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । शहरात मध्यरात्री चोरट्यांनी चार कार्यालये व एका मोबाईल दुकानास टार्गेट करीत लाखोंचा ऐवज लंपास केला असून, विशेष बाब म्हणजे हे भामटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआरही चोरून घेऊन गेले.
मिळालेला माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या चोरट्यांनी गोलाणी मार्केटसमोरील वाघ चेंबर या अपार्टमेंटला टार्गेट करीत येथील चार कार्यालयांत चोरी केली. परंतु तेथे त्यांच्या हाती फारसे काही मौल्यवान ऐवज न लागल्याने चोरांनी याच अपार्टमेंटमध्ये असलेल्या ‘आयफोनवाला’ या दुकानातील ६ हजार रुपयांची रोकड, ६ महागडे आयफोन व २ महागड्या सॅमसंग मोबाईल्ससह सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर सेट लांबविला आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सदर दुकानाचे मालक विनीत आहुजा यांनी दुकान उघडले असता, दुकानातील वरील मजल्याची लाकडी फळी तोडल्याचे व सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचेसह डीबी कर्मचारी व ठसेतज्ज्ञांनी भेट दिली. तसेच या परिसरातील आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासणे सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम