अखेर नरभक्षक वाघ जेरबंद ; वन विभागाचा सापळा ठरलं यशस्वी

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  गडचिरोली  येथील वडसा वनविभागात १३ व्यक्तींचा बळी घेतलेल्या सी टी१ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्याल वडसा तालुक्यातील जंगलात हा वाघ वावरत होता. सीटी 1 (नर) या वाघाने वडसा वनविभागात 6, भंडारा वनविभागात 4 व ब्रम्हपुरी वनविभागात 3, असे एकुण 13 मानवी बळी घेतले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी दिल्या होत्या.
बुधवारी देसाइगंज लगत वळुमाता येथे वाघाने गाईला ठार केले होते. त्यामुळे या शिकारीजवळच वनविभागाच्या चमुने दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. रात्रभर बंकर केजमध्ये बसून अधिकाऱ्यांनी वाघावर पाळत ठेवली. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला. तेव्हा बंकर केजमध्ये तैनात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शॉर्पशूटर) ए. सी. मराठे, वन्यजीव अभ्यासक राकेश अहुजा व त्यांच्या इतर टिम सदस्यांनी तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून वाघाला बेशुध्द केले. त्यानंतर वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापुर्वी कोणतीही इजा न होऊ देता वाघाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. वाघाला जेरबंद केल्याची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनसंरक्षक यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठवण्याबाबत वरिष्ठाचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
सी टी 1 वाघाने डिसेंबर 2021 पासून आतापर्यंत एकुण 13 लोकांचा बळी घेतल्यामुळे स्थानिकांमध्येही या वाघाबद्दल रोष निर्माण झाला होता. स्थानिकांनी लोकप्रतिनिधीद्वारे वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना समन्वयकाची जबादारी देवून वाघाला पकडण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू होते. ताडोबा व्याघ्र शिघ्र बचाव दल, आर आर टी चंद्रपूर, नवेगाव नागझीरा व्याघ्र शिघ्र बचाव दल आर आर टी, आणि अमरावती प्रादेशिक शिघ्र बचाव दल आर आर टी वाघाला पकडण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम