हवामान विभागाचा अंदाज : ४८ तासात बरसणार मुसळधार पाऊस !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्यापासून अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. तर यंदाचा मान्सूनचा हंगाम जवळपास पूर्णत: संपला असून आता काही ठिकाणी थंडी तर काही भागात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र, जाता जाता अनेक भागात पावसाच्या सरी बसरत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

सोमवारी देशातील काही राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीरला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. आता हवामान खात्याने पुढील २४ तासांतही या भागात पुन्हा मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे.

मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय सिक्कीम, पश्चिम बंगालसह, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचरबरोबर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. केरळचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत मान्सून माघारी परतणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मान्सून पूर्णपणे बाहेर पडला आहे. तसे पाहता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम