सावदा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार बंद परंतु सट्टा,दारू सह इतर अवैध धंदे सर्रास सुरू
कलेक्शन करणारा कलेक्टर कोण..? चर्चेचा विषय
सावदा प्रतिनीधी , सावदा तालुका रावेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे सर्रासपणे ठिकठिकाणी सुरू असून यात जुगार बंद,परंतु सट्टा,अवैध गावठी व देशी दारुची विक्री ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे यांच्याकडून रीतसर मासिक हप्ते कलेक्शन करणारा कलेक्टर कोण..? आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या अवैध धंद्यामुळे ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी वाड्यावस्त्यांवर हे सगळे अवैध धंदे रात्रंदिवस बिनधास्तपणे सुरु असल्याने अल्पवयीन मुलांसह तरुण तुर्क,म्हातारे अर्क या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे घराघरात पती-पत्नी कुटुंबीयांमध्ये , दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरातील महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.
असाच काहीसा प्रकार सावदा गावात सुरु असून या गावात सट्टा,व मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारुची अवैध विक्री होत आहे. पोलिसांच्या गोपनीय विभागाला आणि पोलिसांना किंवा त्यांच्या खबऱ्यांना हे दिसून येत नाही का..? यामुळे संपूर्ण सावदा परिसरात अशांतता पसरली असून महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असल्याचे दिसून येते. या परिसरात, व सावदा शहरातून अवैध धंद्याचे बाबतीत कुणीही आवाज उठवला तर त्याला हे अवैध धंदे करणारे धमक्या देतात व सांगतात की आम्ही खालुन वरपर्यंत हप्ते देतो आमचे कुणीही काहीही करु शकत नाही.तसेच सावदासह परिसरात सरपंच व पोलीस पाटील यांचे या अवैध धंद्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.पोलीस पाटील हे पोलिसांचा तिसरा डोळा असताना या प्रकारे सर्रासपणे अवैध धंदे कसे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे सुरु आहे.
असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे,महिला व काही सुज्ञ नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करुनही या अवैध धंदे कराणारांवर कारवाई केली जात नसल्याने आता महिलावर्ग लवकरच वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.तरी सावदा पोलीसांनी या अवैध धंदे करणारांवर कलेक्शन करणाऱ्या कलेक्टर वर कठोर कारवाई करुन सर्वप्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी केली जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम