पाकिस्तानच्या विश्वचषक संघात हसन अलीचा समावेश !
बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा खांद्याच्या दुखापतीमुळे पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या अंतिम १५ सदस्यीय संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याच्याऐवजी हसन अली याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मुख्य निवडकर्ते इंझमाम-उल-हक यांनी सांगितले की, नसीम शहा याच्याऐवजी अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली याचा संघात समावेश करण्यात आला आहे. २० वर्षीय नसीम आशिया चषकात भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात जखमी झाला होता. त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
इंझमाम यांनी तीन राखीव खेळाडूंची घोषणाही केली असून, ते संघासोबत असणार आहेत. त्यात यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद हॅरिस, फिरकीपट अबरार अहमद आणि वेगवान गोलंदाज जमान खान यांचा समावेश आहे. एखादा खेळाडू जखमी झाला तर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
इंझमाम म्हणाले की, नसीम शहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात बदल करावा लागला. पण, आता निवडलेल्या संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. आमचा संघ विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करेल. पाकिस्तानचा संघ विश्वचषकाआधी २९ सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि ३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. विश्वचषकात ६ ऑक्टोबरला त्यांचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम