येत्या २४ तासात अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक राज्यात मान्सूनने परतण्यास सुरूवात केली असून काही राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह कर्नाटक या भागांमध्ये विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे.
तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने 16 ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, या भागातही मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम