मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून या ; उद्धव ठाकरे !
दै. बातमीदार । १० जुलै २०२३ । राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हात मिळवत सत्तेत भागीदारी केल्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आता राज्याच्या दौर्यावर निघाले असून शरद पवार व उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे.
पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज ते खासदार नवनीत राणा यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीमध्ये आहे. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व नंतर कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. पूर्वी सरकार मतपेटीतून यायचे. मात्र, हल्ली ते खोक्यातून येत आहे, असे खोचक भाष्य करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या लोकशाहीला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार माझ्यासाठी राजा आहे. मतदाराला मी गुलाम मानत नाही. आज आपला फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. पण, या मेळाव्यामधील गर्दी पाहून अनेकांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यावर आरोप केला जातो की मी घरी बसून होतो. पण, मी घरी बसून कोणाची घरे फोडली नाहीत. तसेच, मला घरी बसून जे काम करता आले ते काम तुला घरे फोडूनही जमत नाहीये. सत्तेत नसूनही जनता माझ्यावर अफाट प्रेम करत आहे. मात्र, तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. मात्र, त्या शक्तीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या. तुम्ही राजकारणातील नामर्द आहात. फक्त अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खांद्यावर बसवून पुढे आणले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणतो आमच्याकडे विश्वातील सर्वात लोकप्रिय, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. तरीही भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसऱ्यांची घरे फोडण्याची गरज का पडत आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, आतात चाय पे चर्चा नव्हे तर टपरीवर चर्चा व्हायला हवी. जिकडे जा तिकडे केवळ मोदींच्याच जाहीरातींचे फोटो दिसतात. मात्र, सर्वसामान्यांना या योजनांचा फायदा झालाच नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर वास्तव समोर आणणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे निष्ठावंत आता कुणाचे ओझे उचलत आहेत. ज्या भाजपच्या निष्ठावंतांनी प्रसंगी मार खाऊन पक्ष वाढवला, त्यांच्यावरच आता विरोधकांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागत आहे. छगन भुजबळांमुळे बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात जावे लागले, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असे सांगत गद्दारांनी शिवसेना फोडली. मात्र, आता त्याच छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. आता काय सांगणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला. उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना मला सोडून जायचे आहे त्यांनी जावे. पण, शिवसेनेत मी मळ देऊ येणार नाही. कोरोना असताना इतर राज्यात मृतदेह नदीत वाहत होते. त्यांच्या मृतदेहांची विटंबना होत होती. हे मी महाराष्ट्रात होऊ दिले नाही. हेच भाजपच्या पोटात दुखत आहे. यांना इतर विकासात्मक भरीव कामे करता येत नाही म्हणून आता समान नागरी कायदा समोर आणला जात आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील राम मंदिराचा मुद्दा तापवला जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम