कोहलीच्या खेळीने भारताचा विजय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

भारतीय संघाने फिरकीसमोर (५ बळी) २७.१ षटकांत अवघ्या ८३ धावाच्या बळावर तब्बल २४३ धावांनी विश्वचषकातील सलग आठव्या विजयाला गवसणी घालत गुणतालिकेतील आपले अग्रस्थान ( १६ गुण) आणखी भक्कम केले. कोहली गत लढतीत धरमशालातील मैदानात (९५) आणि मुंबईत ८८ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्या विक्रमी शतकाची प्रतीक्षा लांबली होती. मात्र, ईडन गार्डनवर शतक झळकावण्याच्या इराद्यानेच त्याने आपल्या खेळाला प्रारंभ केला.

मुंबईकर श्रेयस अय्यरसोबत (७७) त्याने तिसऱ्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी रचली. तत्पूर्वी, संघनायक रोहित शर्मा (४०) आणि शुभमन गिल (२३) यांनी ६२ धावांची सलामी दिली. रोहितने ६ चौकार आणि २ षटकारांनी झटपट धावा काढल्या. मात्र आपल्या खेळीचे अर्धशतकामध्ये तो रूपांतर करू शकला नाही. सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली व श्रेयस जोडीने डावाची सूत्रे हातात घेतली. खेळपट्टीवर चेंडू धिम्या गतीने येत असल्यामुळे धावा काढणे कठीण जात होते. त्यामुळेच दोघांना फटकेबाजीला आवर घालावा लागला. श्रेयसने सातत्य राखत सलग दुसरे अर्धशतक ६४ चेंडूंत झळकावले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो ७ चौकार, २ षटकार लगावून झेलबाद झाला. के. एल. राहुलने (७) निराशा केली. सूर्यकुमार यादवने ५ चौकारांनी १४ चेंडूंत वेगवान २२ धावा काढल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने अखेरच्या चार षटकांत कोहलीला साथीला घेत सहाव्या गड्यासाठी ४१ धावा जोडल्या. जडेजाने १५ चेंडूंत ३ चौकार व एका षटकाराने नाबाद २९ धावा काढल्या.

आफ्रिकेकडून सातव्या क्रमांकावरील मार्को जेनसेनने सर्वाधिक १४ धावा काढल्या. क्विंटन डी कॉक (५), कर्णधार तेम्बा बावुमा (११), रासी वॅन डूर डुसेन (१३), एडन मार्कराम (९), हेनरिच क्लासेन (१), डेव्हिड मिलर (११) असे विश्वचषकात खोऱ्याने धावा काढणाऱ्या आघाडीच्या फळीची भारतीय गोलंदाजीसमोर दांडी उडाली. जडेजाला साथ देत मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मोहम्मद सिराजला एका बळीवर समाधान मानावे लागले. कोहलीने २८९ सामन्यांतील २७७ व्या डावात ४९ वे शतक ठोकले. सचिनने ४९ शतकांसाठी ४६३ सामन्यांतील ४५२ डावांपर्यंत प्रतीक्षा केली होती. कोहलीच्या खात्यात सध्या ४९ शतकांसोबत ७० अर्धशतके जमा आहेत. सचिन ४९ शतकां सोबत ९६ अर्धशतकांनी आघाडीवर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सचिनच्या नावावर शंभर शतके आहेत. कोहली ७९ शतकांनी (कसोटी २९ शतके / ट्वेण्टी-२० एक शतक) या पंक्तीत द्वितीय स्थानावर येतो. विश्वचषकात वाढदिवशी शतक झळकावणारा कोहली आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिसरा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने २०११ विश्वचषकात नाबाद १३१ आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने नुकतीच द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी उभारली होती. भारताकडून वाढदिवशी शतक ठोकण्यातही कोहली तिसऱ्या क्रमांकावर येतो. विनोद कांबळीने १९९३ मध्ये २१ व्या वाढदिवशी जयपूरमध्ये इंग्लंडविरोधात नाबाद शतक साकारले होते. सचिनने १९९८ मध्ये २५ वा वाढदिवस शारजात साजरा करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३४ धावांची वादळी खेळी उभारली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम