योग्य जीवनशैली हेच आजारावर उत्तर – डॉ. प्रवीण घाडीगावकर 

बातमी शेअर करा...
 रोटरी सेंट्रलच्या शिबिरात १५१ व्यक्तींची तपासणी 
जळगाव – आजार  नेमका काय आहे? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे, याची माहिती नसल्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय व उपचार घेतले जातात. त्यामुळे आजाराची माहिती घेऊन योग्य निर्णय व योग्य जीवनशैली हेच आजारावर उत्तर आहे, असे माधवबाग हॉस्पिटलचे मेडिकल ऑपरेशन्स हेड डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी प्रतिपादन केले.
        रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि माधवबाग हॉस्पिटल, खोपोली यांच्या संयुक्त विद्यामाने गणपती नगरातील रोटरी हॉल येथे आरोग्य विषयक जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विष्णू भंगाळे, अध्यक्ष दिनेश थोरात, डॉ.अमित पाटील, डॉ. श्रेयस महाजन, डॉ. श्रद्धा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
         हृदयरोग समज – गैरसमज याविषयी बोलताना डॉ. घाडीगावकर यांनी हृदय गरजेनुसार पाच लिटर रक्त शरीराला पुरवठा करीत असते. आईच्या गर्भात तिसऱ्या महिन्यापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदय कार्यरत असते. हृदय ऑक्सिजन पाठविण्याचा पंप म्हणून काम करते. वजन नियंत्रित असणे गरजेचे आहे. चरबी व ताण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह हे हृदयविकारासाठी धोके आहे असे त्यांनी सांगितले.
      पायावर येणारी सूज, चालताना – जिने चढताना धाप लागणे, चालल्यानंतर छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असून रक्तातील गुठळ्यांमुळे हार्ट अटॅक येतो ब्लॉकेजेसमुळे नाही असे सांगून डॉ. घाडीगावकर यांनी आहार, विहार,विचार याबरोबरच पंचकर्म व आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने हृदयविकाराचा त्रास पूर्णपणे बरा करता येतो असा विश्वास व्यक्त केला.
     रोज व्यायाम करावा, सकाळी उपाशीपोटी पायी चालणे, कार्बोहायड्रेट पदार्थांचे भोजनात ५० टक्के प्रमाण कमी करावे, कडधान्य व सर्व डाळींचे सेवन करावे, सोडियमचे पदार्थ आणि दूध व दुधाचे पदार्थ टाळावे, तेल व मिठाचा वापर कमी करावा अशा टिप्स देत डॉ. घाडीगावकर यांनी आजाराचे प्रमाण कमी करणे आपल्या हातात आहे असे शेवटी सांगितले. उपस्थित्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी शंका निरसन केले.
        रवींद्र मेने यांनी अनुभव कथन केले. सूत्रसंचालन मानद सचिव समर्थसिंग पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या तपासणी शिबिरात १५१ व्यक्तींच्या ईसीजी, एसपीओ 2, रँडम ब्लड शुगर, ब्लडप्रेशर,  हार्ट रेट, वजन या तपासण्या मोफत करण्यात आल्या.
    यासाठी माधवबागचे तुषार पाटील, योगेश पाटील, प्रशांत गडमाळे, माधुरी साळुंखे,प्रियंका पाटील, वंदना कासार  यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम