तांदळी, कळमसरे रस्त्याची अवघ्या पाच वर्षात झाली चाळण

बातमी शेअर करा...

एस.टी. बंद होण्याच्या भितीने ग्रामस्थांची बसली पाचावर धारण

सुनिल इंदलसिंग परदेशी यांचा आंदोलनाचा इशारा

तांदळी ता. अमळनेर ;- अमळनेर तालुक्यातील तांदळी ते कळमसरे रस्त्याची अवघ्या पाच वर्षात चाळण झाली असून रस्त्याच्या दूर्दशेमुळे सामान्यांचे हक्काचे वाहन ‘लालपरी’ बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार झालेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा सनदशिर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा तांदळी येथील सरपंच सौ. रत्नाबाई सुनिल परदेशी यांचे पती सुनिल इंदलसिंग परदेशी यांनी तांदळी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

आपल्या आवाहन पत्रात सुनिल परदेशी यांनी म्हटले आहे की, तांदळी ते कळमसरे मार्गे मारवड, अमळनेर, चोपडा व बेटावद, नरडाणा, शिरपुर, दोंडाईचा, नंदुरबार कडे बसची ये-जा सुरु असते. धुळे-जळगाव अशा दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असून शिंदखेडा तालुक्यातील पढावद, भिलाणे, मुडावद आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी हा रस्ता सुकर आहे,

शेतमाल विक्रीसाठी नेणे अथवा गंभीर झालेल्या रुग्णांना या मार्गावरून सहज उपचारासाठी तातडीने जाणे शक्य होत असे; परंतु आता रस्त्याची दूर्दशा झाल्यामुळे चार चाकी वाहने अडखळत जात असतात व अनेक दुचाकी वाहने पंक्चर झाल्याच्या घटना घडत आहेत. गरीबांच्या सोयीची असलेली एस.टी. बस ही बंद होण्यासाठी किरकोळ कारणही पुरेसे असते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे. उद्धवस्त रस्त्याचे निमित्त करून या मार्गाने जाणारी एस.टी. वाहतुक बंद पडली तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल यासाठी शासनकर्त्यांनी भविष्यातील या संकटातून मार्ग काढावा असे आवाहन तांदळी ग्रामस्थांच्या वतीने सुनिल परदेशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम