दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील भारत विकास परिषदेतर्फे आयोजित “भारत को जानो” प्रश्न मंजुषा स्पर्धेत लहान गटात ला.ना.विद्यालयाने तर मोठ्या गटात बारी समाज माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळविले. ” राष्ट्रीय चेतना के स्वर” या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत विवेकानंद इंग्लीश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या संघाची पैठण येथे 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रांत स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नवजीवन मंगल कार्यालयाच्या तीन सभागृहात एकाच वेळी तीन गटांच्या स्पर्धा झाल्या. या दोन्ही स्पर्धा भारत विकास परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या संस्कार वृद्धीसाठी दरवर्षी स्थानिक, प्रांत, क्षेत्रीय व राष्ट्रीय या चार पातळीवर आयोजित करण्यात येतात. २३ विविध शाळांमधील २५० पेक्षा जास्त विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनास डॉ. विवेक काटदरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक मायाराम तर पारितोषिक वितरणास शिक्षणाधिकारी विकास पाटील, पेस-आयआयटी ॲकेडमीच्या सविता वाणी तसेच भाविपचे प्रांत उपाध्यक्ष अरुण जोशी, अध्यक्ष महेश जडीये, सचिव उमेश पाटील, प्रकल्प प्रमुख राधिका नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाच्या इतिहास, भारतीय संस्कृती आणि सामान्य ज्ञानावर आधारीत “भारत को जानो” या प्रश्न मंजुषा स्पर्धेत ६ वी ते ८ वी या लहान गटात स.न.झंवर विद्यालय, पाळधी यांनी द्वितीय तर ९ वी ते १० वी मोठ्या गटात विवेकानंद इंग्लीश मिडीयम स्कूल ने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. देशभक्तीपर गीतांवर आधारीत “राष्ट्रीय चेतना के स्वर” या समूहगान स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेने द्वितीय तर एल.एच.पाटील इंग्लीश मिडियम स्कूलने तृतीय क्रमांक प्राप्त केले.
समूहगान स्पर्धेचे संपदा छापेकर व पंकज भावसार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी इलेक्ट्रॉनिक्स बझर सिस्टिम आणि प्रोजेक्टर डिस्प्लेची जबाबदारी माजी अध्यक्ष उज्ज्वल चौधरी व प्रसन्न मांडे यांनी सांभाळली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम