जळगावमध्ये कामगाराची धारदार शस्त्राने हत्या, तिघे आरोपी अटकेत

बातमी शेअर करा...

जळगाव सोमवारी, ३ जून रोजी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात खुनांच्या मालिकेत अजून एक भर पडली असून, एका कामगाराचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून खून करण्यात आला आहे. या घटनेचे कारण किरकोळ वाद असल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

कामगार ललित प्रल्हाद वाणी (वय ४५, रा. नाथवाडा, जळगाव) यांचा मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास खून झाला. सुप्रीम कंपनीत दुसरी शिफ्ट आटोपून ते घरी परतत होते. इच्छादेवी चौकात रात्री ११:४० वाजता उतरल्यानंतर नाथवाडा परिसरातील घराकडे ते पायी निघाले. नाथवाडा परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी ते जात असताना संशयित आरोपी कमल किशोर बागडे (वय २०, रा. कंजरवाडा, जळगाव), हेमंत उर्फ हुल्या सपकाळे (वय २०, तुकाराम गाडी, जळगाव), आणि युवराज कैलास पाटील (वय १८, जानकी नगर, जळगाव) यांनी त्यांना अडवले.

ललित वाणी आणि तिघा आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. वादाच्या वेळी तिघांनी वाणी यांना मारहाण केली आणि एकाने त्यांच्या मानेवर चाकूने वार केला. या हल्ल्यात ललित वाणी खाली कोसळले. घटनेनंतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना ललित वाणी यांचा मृतदेह आढळला आणि या घटनेची माहिती समोर आली.

अटक केलेले आरोपी कमल बागडे, हेमंत सपकाळे आणि युवराज पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ललित वाणी यांच्या पत्नी मेघा ललित वाणी (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय आसाराम मनोरे, पीएसआय रविंद्र चौधरी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सचिन मुंडे, राजेंद्र कांडेकर आणि रतीलाल पवार यांनी संशयित आरोपींना अटक केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम