राज्यातील लालपरीचे तब्बल ४ कोटी रुपयांचे नुकसान !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | राज्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती आहे. एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. रविवारीही जालन्यात वातावरण तणावाचे असल्याने जालन्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान लाठीमारामध्ये झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामुळे राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोका केला. एसटी महामंडळाच्या काही गाड्या जाळण्यात आल्या, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी बस थांबवून नुकसान करण्यात आले. आतापर्यंत १९ गाड्यांची जाळपोळ झाली आहे. महामंडळाला यामुळे अंदाचे ४ कोटींचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे एसटी महामंडळाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जालन्यासह नांदेड जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यातील बस फेऱ्यांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. रविवारीही मराठा आंदोलकांचा संताप कायम असल्याने बस स्थानकांमधून कमी गाड्या बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम