माहेश्वरी सभेतर्फे समाजातील मान्यवरांचा ‘सत्कार सोहळा’ संपन्न
दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे माहेश्वरी समाजात दरवर्षी जे लोक तन-मन-धनाने विशेष उल्लेखनीय कार्य करतात, त्यांचा सत्कार केला जातो. परंतु मागील दोन वर्षे लाॅकडाऊन असल्याकारणाने हा कार्यक्रम आयोजित होऊ शकला नाही. म्हणून, यावर्षी हा सत्कार सोहळा दिनांक १७ व १८ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे संपन्न झाला. सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश सभेचे व देशभराच्या विविध राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जळगाव येथील प्रसिद्ध ॲडव्होकेट, समाजसेवी तथा जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नारायण रामदयाल लाठी यांनी जिल्ह्यातील माहेश्वरी समाजात जागेसहित १२० घरे बनवून देण्याची संकल्पना मांडत समाजात कोणीही बेघर राहू नये, असा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी महेश भवन, बालाजी मंदिर भवन निर्माण करण्याचाही संकल्प केला. लाठी हे रिंग रोड येथील महेश भवनाचे कार्यकारी संचालक, लोहन माता कुलस्वामिनी ट्रस्टचे अध्यक्ष व बालाजी मंदिर संस्थेचे विश्वस्तही आहेत. त्यांच्या या विविध उल्लेखनीय कार्यांची दखल घेत माहेश्वरी महाराष्ट्र प्रदेश सभेने त्यांना विशेष सन्मानपत्र जाहीर केले.
या सत्कार सोहळ्यात अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, महामंत्री संदीप काबरा, प्रदेशाध्यक्ष संजय भंसाली, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माहेश्वरी समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या समाजसेवी कार्यांची माहिती देण्यात आली व ‘सुयोग’ या स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमात ॲडव्होकेट नारायण रामदयाल लाठी यांच्या सत्काराबरोबरच राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. यात जालन्याचे विजय राठी, कोल्हापूर ग्रामीण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, तळेगावचे डॉक्टर शालिग्राम भंडारी, जळगावचे कौशिक बंग, देवेश भैय्या, संगीता बियाणी, सुधा काबरा आदींना हा बहुमान प्राप्त झाला. यावेळी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेच्या पदाधिकाऱ्यांसह केदार मुंदडा, मोतीलाल झंवर, संजय दहाड, मनीष झंवर, ॲड. राजेंद्र झंवर आदी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम