“माझी शेती माझा सातबारा,मीच लिहीणार माझा पिकपेरा”

जिल्हाधिकारी यांनी बांधावर जाऊन सांगीतले महत्व

बातमी शेअर करा...

 

 

अकोला दि.29 ऑगस्ट | जिल्ह्यात ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतामधील पिकपेरा स्वत: भरावयाचा आहे. त्यांना तो भरता यावा याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी खोबरखेड ता अकोला येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून ‘ई-पीक पाहणी’ व नोंदी स्वत: मोबाईलमध्ये प्रात्यक्षिक करुन शेतकरी बांधवाना त्याचे महत्त्व समजावून सांगितले. या सुविधेचा लाभ सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले.

 

पाहणी दौऱ्या दरम्यान उपजिल्हाधिकारी(महसूल) गजानन सुरंजे, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा हेल्प डेस्कचे प्रसाद रानडे, मंडळ अधिकारी शेख अन्सार, नितीन शिंदे, तलाठी रजनी घुगे, सरपंच वैभव तराळे, कोतवाल, पोलिस पाटील, शेतकरी आदी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतामधील पिकपेरा स्वत: भरता यावा याकरीता जमाबंदी आयुक्‍त आणि संचालक भुमि अभिलेख, पुणे यांनी मोबाइल अॅप विकसित केले आहे. या ॲपवर पिकांचे फोटो अपलोड करुन पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. या मुळे शासनाला पिकांची अचुक माहिती मिळणार असून गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा अधिकार अभिलेख विषय असून गाव नमुना बारा हा पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाइल अॅपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. मोबाइल अॅपमध्‍ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्‍याने त्‍या शेतकऱ्यांच्‍या शेताचे स्‍थानही तलाठ्याला कळणार आहे. या अॅपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलि हाउसमधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या अॅपमध्ये 580 पिकांची नोंदी घेता येणार आहेत.

गावपातळीवरून पीक पेरणी अहवालाची वास्तववादी माहिती संकलित व्हावी, तसेच संकलित माहिती पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे, याकरीता पीक पेरणीबाबतची माहिती ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे सातबारा उताऱ्यामध्‍ये नोंदविण्याची सुविधा शासना कडून उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम