आता दिल्लीच्या राजकारणात अजित पवार होणार सक्रीय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असताना आता भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. एनडीएची 18 जुलैला दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात एंट्री होणार आहे. गेली अनेक वर्षे शरद पवारांनी दिल्लीच्या राजकारणात आपले एक वेगळे वलय निर्माण केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची छबी निर्माण करण्याची तयारी करणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने 18 जुलै रोजी बोलवलेल्या या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसच गेल्या काही दिवसात भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू सुद्धा पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसच लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवानही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक वर्षभरावर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे देखील बिगुल वाजणार आहे. या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यात आजच भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 4 राज्यांतील निवडणूक प्रभारींची घोषणा केली. प्रल्हाद जोशी यांच्याकडे राजस्थान, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य प्रदेश, ओपी माथूर यांच्याकडे छत्तीसगड आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे तेलंगणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात मध्य प्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि तेलंगणात सध्या बी.आर.एस. सत्तेत आहे.

यापूर्वी 3 जुलै रोजी भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले होते. काँग्रेसमधून आलेल्या सुनील जाखड यांच्याकडे पंजाब, डी पुरंदेश्वरी यांना आंध्र प्रदेशात, जी किशन रेड्डी यांच्याकडे तेलंगणात आणि बाबू लाल मरांडी यांच्याकडे झारखंडमध्ये पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. याशिवाय पक्षाच्या हायकमांडने एटाला राजेंद्र यांची तेलंगणातील भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांची राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले. किरण यांनी या वर्षी एप्रिलमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम