ग्रामपंचायत निवडणुकीत अघोरीकृत्य : उमेदवाराच्या फोटोला लिंबू, दोरे !
बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३
राज्यात आज अनेक ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे मतदान सुरु असतांना भानामतीसारखे अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य समोर आले असून सांगली व कोल्हापूरमध्ये अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. सांगली जिह्यातील मिरज तालुक्यातील हरीपूर गावात शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा, भानामतीचा प्रकार उघडकीस आला होता. गावाच्या वेशीवर बाहुल्या, हळद कुंकू आढळून आले.
येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चार जणी सरपंचपदासाठी उभ्या आहेत. गुरुवारी प्रचार शांततेत संपला असताना गावाच्या वेशीवर शुक्रवारी सकाळी काळ्या जादूचा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. हे लक्षात येताच निवडणुकीला उभे असलेल्या मोहिते गटाचे फाकडे सचिन फाकडे यांनी या सर्व बाहुल्या एकत्र करून पेटवून दिल्या. अशा अंधश्रद्धांना ग्रामस्थ थारा देणार नाहीत, असे ते म्हणाले. आज कोल्हापूर जिह्यातील राधानगरीमधील कसबा वाळवे गावात असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली. सध्या गावामध्य ग्रामपंचायतसाठी दुरंगी लढत सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून पूर्ण शक्ती पणाला लावली जात आहे. मात्र, आज निवडणूक केंद्राबाहेर उमेदवारांचे फोटो कापलेल्या कोहळ्यात घालून त्यावर गुलाल, हळद-कुंकू लावून लिंबू, दोरे, खिळे, दामण लावून विशिष्ट पद्धतीने ठेवले होते. आज सकाळी हा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नंतर ते साहित्य नष्ट करण्यात आले. याप्रकरणाची सध्या गावात चांगलीच चर्चा आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम